जळगाव - शहरात दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी हातचलाखीने सोन्याच्या बांगड्या चोरल्याची घटना समोर आली आहे. ही चोरीची घटना आर.सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरुममध्ये घडली. शनिवारी दुपारी घडलेल्या चोरीच्या घटनेत आरोपी महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. त्यांनी चोरलेल्या ७६ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे मूल्य अडीच लाख रुपये आहे.
सराफ बाजारात आर. सी. बाफना ज्वेलर्सचे नयनतारा हे दागिन्यांचे शोरुम आहे. याठिकाणी शनिवारी दुपारी तीन महिला दागिने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी सेल्समनकडून सोन्याच्या बांगड्या बघत असताना हातचलाखी केली. यावेळी ७६ ग्रॅम वजनाच्या अडीच लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या लांबविल्या आहेत. यानंतर त्या महिला खरेदी न करताच निघून गेल्या. शोरुमचे व्यवस्थापक धीरज जैन व त्यांचे सहकारी मनोज खिंवसरा आणि सुरेश सांखला हे रात्री दागिन्यांचा साठा तपासत होते. त्यांना ७६ ग्रॅम वजनाच्या चार बांगड्या कमी असल्याचे लक्षात आले.
सीसीटीव्ही पाहिल्याने कळाली चोरी-
संशय आल्याने धीरज जैन यांनी शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. शनिवारी दुपारी ३.२२ ते ३.३६ वाजण्याच्यादरम्यान तीन महिलांनी वेगवेगळ्या आकाराच्या बांगड्या हातात घातल्याचे दिसून आले. यातील एका महिलेने या बांगड्या हातचलाखी करुन लांबविल्याचे सीसीटीव्हीत त्यांना दिसले. त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार देताच शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.