जळगाव - शहरातील मेहरूण परिसरात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांसह 27 जणांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने नमाज अदा केली. मानवावर कोरोनारुपी आलेल्या संकटाचे लवकर निवारण होऊ दे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
मेहरूण परिसरात राहणाऱ्या एका 49 वर्षीय व्यक्तीच्या कोरोना तपासणीचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने खबरदारी म्हणून पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन केले. त्या सर्वांचे नमुने घेऊन ते वैद्यकीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाला प्राप्त झाला असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ही बाब समजताच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने सुटकेचा निः श्वास सोडला आहे. यानंतर त्यांनी एकत्र येत नमाज अदा केली.
कोरोनाच्या संकटातून जगाची कायमस्वरूपी मुक्ती होऊ दे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.