जळगाव - कोरोना पाठोपाठ आता म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य जीवघेणा आजार आपले हातपाय पसरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आजाराने ग्रस्त असलेल्या फक्त 25 रुग्णांची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. म्यूकरमायकोसिसची लागण झालेले बहुतांश रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयासह मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे या रुग्णांची अद्ययावत आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा आजार जिल्ह्यात नेमका किती प्रमाणात बळावला आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
6 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत म्यूकरमायकोसिसच्या 25 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 6 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 2 रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत होते. तर 4 जण पोस्ट कोविड रुग्ण होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही आता म्यूकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष कक्ष
म्यूकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 7 मध्ये एक विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. येथे म्यूकरमायकोसिसची लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
म्यूकरमायकोसिस रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार
आता म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार होणार आहेत. डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्येही रुग्ण दाखल केले जात आहेत. या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या ॲम्फोटेरेसीन बी या इंजेक्शनचा जळगावात देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. जे रुग्ण दाखल आहेत, त्यांच्यावर इतर गोळ्या-औषधांच्या सहाय्याने उपचार सुरू आहेत. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अजून म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया झालेली नसल्याची माहिती मिळाली.
रुग्णांची माहिती संकलन सुरू
जिल्ह्यातील म्यूकरमायकोसिसच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती दिली. 'जिल्ह्यात सद्यस्थितीत म्यूकरमायकोसिसच्या 25 रुग्णांची नोंद आहे. त्यातील 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय खासगी रुग्णालयातही या आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची माहिती एकत्रितपणे संकलित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी एक गुगल शीट तयार केली आहे.
'खासगी रुग्णालयांना गुगल शीट अपडेट करने बंधनकारक'
'खासगी रुग्णालयांना या गुगल शीटमध्ये त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या म्यूकरमायकोसिस रुग्णांची माहिती नियमितपणे अपडेट करावी लागणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद अशा ठिकाणी उपचारासाठी गेलेल्या रुग्णांची माहिती मिळवणे सुरू आहे. येत्या काही दिवसात प्रशासनाकडे अद्ययावत आकडेवारी उपलब्ध होईल', असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाची त्रिसूत्री उपाययोजना
'म्यूकरमायकोसिसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्रिसूत्री उपाययोजना आखली आहे. त्यात, जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, ज्यांना मधुमेह, कॅन्सर अशा आजारांची पार्श्वभूमी आहे. त्यांची माहिती संबंधित रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाला द्यावी. अशा रुग्णांची तपासणी करून त्यांना म्यूकरमायकोसिसची लागण होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत. यात कोरोनाचे उपचार सुरू असताना ज्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर स्टेरॉइड्स दिले गेले आहेत, अशांचीही माहिती घेवून हिच कार्यपद्धती अवलंबली जावी. याशिवाय दुसरे सूत्र म्हणजे ज्या रुग्णांना म्यूकरमायकोसिस झाला आहे. त्यांच्यावर योग्य तो औषधोपचार करावा. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशा रुग्णांसाठी विशेष कक्ष उभारला आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून खासगी रुग्णालयांमध्येही उपचाराची व्यवस्था करण्यात येईल. तिसरे सूत्र म्हणजे, जे रुग्ण शस्त्रक्रियेच्या टप्प्यात आले आहेत. अशांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी यंत्रणेच्या परस्पर समन्वयातून ॲक्शन प्लान तयार करावा. या त्रिसूत्रीच्या सहाय्याने म्यूकरमायकोसिसवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत', अशीही माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.
हेही वाचा - मुंबई लसीकरणात आघाडीवर, मात्र उद्दिष्टापासून पिछाडीवर