जळगाव- कोरोना विषाणूचा उद्रेक सुरू असल्यामुळे सर्वच उद्योग ठप्प झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्यानंतर चीनने बाहेरील देशांमधून आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या मालावर बंदी घातली आहे. चीन हा जगातील प्रमुख कापूस आयातदार देश आहे. चीनने कापसाची आयात थांबवल्याने भारतातील कापूस बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाला मागणीच नसल्याने खान्देशातील कापूस बाजाराचे तब्बल 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा- मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
यावर्षी डिसेंबरमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली. मात्र, हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापूस बाजाराला ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. चीन व अमेरिकेतील 'ट्रेड वॉर'मुळे कापसाला जास्त उठाव नव्हता. त्यामुळे दर्जेदार कापूस खरेदीवरच व्यापारी व जिनर्सचा भर होता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या मालाबाबत व्यापारी व जिनर्सने अनेक निकष लावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाइतका देखील भाव मिळाला नाही. त्यामुळे काही महिन्यानंतर कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी बाजारात आणलाच नाही. मात्र, जानेवारी महिन्यात चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चीनने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यापासून भारतासह इतर देशातील कापूस खरेदी करण्यास बंदी आणली. विशेष म्हणजे, भारत सरकारनेही चीनमध्ये माल पाठविण्यावर मर्यादा आणल्या. आधीच मंदीत असलेल्या कॉटन बाजारावर यामुळे मोठा परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटल्यामुळे सीसीआय व जिनर्सने कापूस खरेदीस अनेक निकष लावले.
जिनिंगची धडधड थांबली, मजुरांवर उपासमारीची वेळ-
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिनिंग व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सर्वच जिनिंगची धडधड थांबली असून हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिनिंगमध्ये कापूस पिंजून तयार झालेल्या कापसाच्या गाठी देखील पडून आहेत. गाठींची विक्री न झाल्याने जिनिंग व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. एकूणच काय तर कोरोनामुळे कापूस बाजाराचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.