जळगाव - जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या 2 समर्थकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडले. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारी मुंड्या चित केले; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर
चंद्रशेखर अत्तरदे यांचे काही समर्थक म्हसावद गावात मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते पवन सोनवणे यांच्यासह इतरांना मिळाली होती. सोनवणे यांनी अत्तरदे यांच्या समर्थकांना हटकले. त्यांच्या वाहनातून बंद पाकिटात असलेली रोकड ताब्यात घेण्यात आली. पैशांची पाकिटे घेऊन फिरणाऱ्या दोघांना देखील ताब्यात घेण्याचे आले. राहुल कोल्हे आणि हरीश पाटील अशी त्यांची नावे आहेत. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची पोलखोल केल्याने ते निरुत्तर झाले. या घटनेची माहिती तत्काळ सर्वत्र पसरली. सुरुवातीला सोशल मीडियावर अत्तरदे यांच्या समर्थकांकडून 1 कोटी रुपये पकडल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडून २१ हजारांची रोकड जप्त केल्याचे सांगितले. जप्त केलेले पैसे भरारी पथकाकडे सोपविण्यात आले आहेत.
हेही वाचा - काश्मीरच्या जमिनी घेण्यासाठी 370 कलम रद्द - प्रकाश आंबेडकर
दरम्यान, मतदाराच्या चिठ्ठ्या पाहण्यासाठी गेलेल्या आपल्या समर्थकांना दादागिरी करून सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे रोकड असल्याचे जबरदस्तीने वदवून घेतले. पैसे वाटण्याचा काहीही प्रकार घडला नसल्याचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी सांगितले.