जळगाव - संततधार पावसामुळे मातीचे घर शेजारील पत्र्याच्या शेडवर पडल्याने आदिवासी पावरा समाजाचे कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेत २ बालके ठार झाली. ही घटना अमळनेर तालुक्यातील बाम्हणे गावात बुधवारी मध्यरात्री घडली.
जितेश पावरा व राहुल पावरा अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांची नावे आहेत. या घटनेत पुना सदा पावरा तसेच त्यांची पत्नी शांताबाई पावरा हे दोघे देखील जखमी झाले आहेत. पुना पावरा हे कुटुंबीयांसह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. बाम्हणे गावात शेतमजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत.
जळगाव जिल्ह्यात मागील ४ ते ५ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पावरा कुटुंब राहत असलेल्या पत्र्याच्या शेडवर बुधवारी मध्यरात्रीनंतर शेजारील मातीचे घर कोसळले. यावेळी मोठा आवाज झाल्याने शेजारील ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी पुना पावरा व शांताबाई पावरा यांना वाचवले. परंतु, जितेश व राहुल यांना वाचविण्यात मात्र त्यांना अपयश आले.
या घटनेमुळे बाम्हणे गावावर एकच शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.