जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. बुधवारी १९ कोरोनाबाधितांची भर पडली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० वर पोहोचली आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये अमळनेर शहरातील 18 रुग्णांचा समावेश आहे, तर एक रुग्ण हा भुसावळ शहरातील आहे.
स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी 65 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून, 19 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा, तर अमळनेर येथील 18 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 85 इतकी झाली असून, त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील अमळनेर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. अमळनेर शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी तब्बल 18 रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे यापूर्वीच्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे सांगितले जात आहे.