जळगाव - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 346 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील भडगाव शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. गेल्या आठवडाभरापासून भडगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.
जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, पाचोरा, रावेर, शेंदूर्णी, पहूर आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 134 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाले. यापैकी 119 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 15 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील 13, पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील 1 व रावेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 346 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.