जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भाजीपाला आणि फळे खरेदी करणाऱ्या घाऊक खरेदीदारांना अधिकृत ओळखपत्रे वितरित केले आहेत. मात्र, असे असतानाही काही जणांनी बनावट ओळखपत्र बनवून कृषी उत्पन्न बाजार समितीत अनधिकृत प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी 15 जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रमेश किसनराव माळी यांनी तक्रार दाखल केली आहे. १५ जणांनी बनावट ओळखपत्र बनवून कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक केली आहे. त्याचप्रमाणे, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचेही उल्लंघन केले आहे, असे माळी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सकाळी 6 वाजता फळे व भाजीपाल्याचा लिलाव केला जातो. यावेळी घाऊक आणि किरकोळ खरेदीदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत सचिव रमेश माळी यांच्यासह कनिष्ठ लिपिक सुधाकर सूर्यवंशी, कोषापाल कैलास शिंदे, कनिष्ठ लिपिक अरुण सुर्वे, मुख्य लिपिक अशोक कुदळ यांचा समावेश होता.
लिलावावेळी गर्दी होऊ नये म्हणून या समितीच्यावतीने काही फळे व भाजीपाला खरेदीदारांना बाजार समितीच्या सही व शिक्क्यानिशी अधिकृत ओळखपत्र प्रदान करण्यात आली होती. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर तपासणीला उपस्थित असलेल्या विशेष समितीच्या काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले की, काही जणांनी बनावट ओळखपत्र तयार करुन बाजार समितीत लिलावासाठी प्रवेश मिळवला. ही बाब बाजार समिती प्रशासनाने गांभीर्याने घेतली. त्यानुसार बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा -
शेख शकिल शेख रमजान (जळगाव), गणेश मधुकर राणे (कासमवाडी, जळगाव), विद्या गणेश राणे (कासमवाडी, जळगाव), शेख रशीद शेख बाबू (दूध फेडरेशन, जळगाव), आनंदा तुकाराम जमदाडे (जळगाव), नफीस खान हाफिज खान (जळगाव), महेंद्र भास्कर गजरे (यावल), विशाल सुभाष नाईक (महादेव नगर, जळगाव), मोहम्मद शहा युनूस शहा (जळगाव), अंजनाबाई साहेबराव (जळगाव), पितांबर मच्छिंद्र भिंगाने (जळगाव), प्रकाश फकिरा बिऱ्हाडे (असोदा, ता. जळगाव), ईश्वर गुणाजी गव्हाणे (नाथवाडी, जळगाव), नंदाबाई भास्कर भालेराव (जळगाव), विश्वनाथ त्र्यंबक (जळगाव).