जळगाव - पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने निसर्गचक्रही कोलमडले आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. हीच बाब लक्षात घेऊन चोपडा तालुक्यात असलेल्या घुमावल बुद्रुक येथील शेतकरी गुरुदास वाघ यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळीला आहेर म्हणून 1 हजार वृक्षांची रोपे भेट दिली. सर्वांना वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे, हा त्यांचा त्यामागचा उद्देश होता.
विवाह सोहळा आणि आहेर हे एकप्रकारे विजोड जोडपे मानले जाते. अनेक जण आपल्या श्रीमंतीचे दर्शन घडविण्यासाठी विवाह सोहळ्यात आलेल्या आप्तेष्टांना महागडे आहेर भेट देतात. परंतु, घुमावल बुद्रुक येथील गुरुदास वाघ यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आपल्या मुलाचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने तर पार पाडलाच. पण विवाह सोहळ्यासाठी आलेल्या आप्तेष्टांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व कळावे म्हणून वृक्षांच्या रोपांचा अनोखा आहेरही भेट दिला.
गुरुदास वाघ यांचे ज्येष्ठ चिरंजीव विक्की वाघ यांचा विवाह नुकताच पारोळा तालुक्यातील सावरखेडा येथील छोटू सरदार यांची कन्या रोशनी सरदार हिच्याशी झाला. हा विवाह सोहळा संस्मरणीय झाला तो सोहळ्यात देण्यात आलेल्या जगावेगळ्या आहेरामुळे. पर्यावरणात वृक्षांचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून जास्तीत जास्त वृक्षांची लागवड व्हावी, यासाठी विवाह सोहळ्यात उपस्थितांना आहेर म्हणून एक हजार निंबाच्या वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. एवढेच नव्हे तर, पाहुणे मंडळीला आहेर म्हणून दिलेली रोपे घरापर्यंत सुरक्षित नेता यावीत, यासाठी पर्यावरणपूरक सुती कापडी पिशव्या देखील देण्यात आल्या. प्रत्येक कापडी पिशवीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश लिहिण्यात आला होता.
विवाह सोहळ्यात आहेर म्हणून महागड्या वस्तू देण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला वाघ यांनी फाटा देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दात पर्यावरणप्रेमींकडून त्यांचे कौतूक केले जात आहे.
वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासाळला आहे. त्यामुळे अनियमित पर्जन्यमान, तापमान वाढ अशा भयंकर संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव मार्ग आहे. ही बाब सर्वांना कळावी म्हणून मी हा उपक्रम राबवला, अशी प्रतिक्रिया गुरुदास वाघ यांनी दिली.