हिंगोली - देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून प्रत्येक घटकाला कोरोनाचे चटके जाणवत आहेत. सर्वसामान्य कुटुंबात विदारक परिस्थिती निर्माण झाली असून आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. एका युवकाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे घडली. आज सकाळी 6.30 सुमारास त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.
सुनील केशवराव मुंढरे (40) असे युवकाच नाव आहे. या युवकाच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. मिळेल ते काम करून हे कुटुंब संसाराचा गाडा हाकत होते. मात्र, कोरोनामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हाताला काही काम नसल्याने ते हताश झाले होते. दैनंदिन अडचणी पिच्छा सोडत नव्हत्या. काही काम नसल्याने, उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती.
कुटुंबाची ही परिस्थिती सुनीलला अजिबात पाहवत नव्हती. घरातील हलाखीची परिस्थिती पाहून तो नैरश्यात गेला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तो एवढा मानसिक तणावाखाली आला होता, की तो एकांतात राहू लागला. अशाच परिस्थिती त्याने आज आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.