हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली नगरपालिकेच्यावतीने जीवाची जराही पर्वा न करता सफाई कामगार दिवस रात्र शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झगडत आहेत. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6. 45 वाजता शहरातील मस्तानशहा नगरात निर्जंतुकीकरण करताना काही जणांनी ट्रॅक्टरचालकाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील काही आरोपी अटक केले आहेत तर उर्वरित आरोपीला अटक करण्यासाठी पालिकेने आज काम बंद ठेवले आहे. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तो पर्यंत अजिबात काम सुरू करणार नसल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पालिका साफ सफाई, तसेच स्वच्छता करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. अन शहर स्वच्छ व सुंदर ठेवत आहेत. पालिकेच्यावतीने शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी गल्ली बोळात ट्रॅक्टर वरून फवारणी केली जात आहे. अशा परिस्थितीत मस्तानशहा नगर मध्ये निर्जंतुकीकरण सुरू असताना तेथील काही जणांनी ट्रॅक्टर अडवून निर्जंतुकीकरणचा पाईप हातात घेत निर्जंतुकीकरणं औषध पिण्याचा प्रयत्न केला. औषधाच्या नावाखाली केवळ पाणीच फवारत आहेत, असे गल्लीमध्ये ओरडून ओरडून सांगत गोंधळ करत होते. यानंतर त्यानी ट्रॅक्टर चालकाला मारहाण केली होती.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील काही आरोपी अटक केली होती. मात्, सर्वच आरोपींना अटक करण्याची मागणी नगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यानी लावून धरत काम बंद आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने पाच आरोपी अटक केले असून एका फरार आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केल्याची माहिती दिली पोलीस उपनिरीक्षक नितीन केनेकर यांनी दिली. सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्याने नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.