हिंगोली - संपूर्ण देशभरात रविवारी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, याच दिवशी जिल्ह्यातील एका महिलेने आपली गळफास घेत आत्महत्या केली. उमा अंकुश लाभाडे (वय - 32, रा. जयपूर) असे या मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
मृत महिलेचे पती अंकुश हे आपल्या आई वडिलांपासून वेगळे राहतात. रविवारी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. तर त्यांची दोन्ही मुली आपल्या आजी आजोबांकडे खेळायला गेल्या होत्या. यानंतर जेवण करण्यासाठी अंकुश हे सकाळी साडे अकरा वाजता घरी आले होते. त्यांनी बराच वेळ पत्नीला आवाज दिला. मात्र, आतून काही ही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अंकुश यांनी घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी पत्नी उमा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
हेही वाचा - "मिलिंद एकबोटेंना वढू गावात जाण्यास बंदी घालावी"
पोलीस पाटील अमरदास परिसरकर यांनी सेनगाव पोलीस ठाण्याला दिली. घटनास्थळी सेनगाव पोलिसांनी धाव घेतली. यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्य़ात आला. सेनगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.
अनेक अडचणींचा सामना करून जीवन जगणाऱ्या महिलांचा रविवारी सन्मान केला गेला. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव देखील केला गेला. मात्र, जागतिक महिला दिनीच एका महिलेने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.