हिंगोली - जिल्ह्यात मुंबईरिटर्न्समुळे आता कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. मुंबईवरून आपल्या गावी परतलेल्या एका 30 वर्षीय महिलेचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंगोलीकरांची चिंता वाढली असून गावात मात्र आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली प्रशासनाच्यावतीने मुंबई, औरंगाबाद, पुणे येथून जिल्ह्यात परतलेल्या सर्वच व्यक्तींना शासकीय क्वारंटाईन केले जात आहे. शक्यतो मुंबई येथून हिंगोली जिल्ह्यात परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. सदर महिलाही हिंगोलीत पोहोचल्यानंतर तिची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती, अन शासकीय होम क्वारंटाईन करण्यात आले होते. या महिलेचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असता, सोमवारी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याचे हिंगोली येथील प्रशासनाने कळविले आहे. महिला ज्या गावातील आहे ते गाव सील करण्याची तयारी प्रशासनाच्या वतीने सुरू केली आहे. आता हिंगोली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 70 झाली आहे. तर, पूर्वीच्या 90 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
अजूनही गांभीर्य नाही; नियमांचे पालन न करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल
ग्रामीण भागात कोरोनाला अजूनही गांभीर्याने घेत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांना मात्र चांगलाच चोप दिला जात आहे. कळमनुरी तालुक्यातील नरवाडी येथील देविदास शामराव माहूरे हा 16 मे रोजी पुणे येथून आला होता. त्याची आरोग्य तपासणी केली असता, त्याला घरीच थसंबण्याचा डॉक्टरने सल्ला दिला होता. मात्र, देविदास हा 24 मे रोजी घरात दिसून आला नाही, त्यामुळे याने पलायन केले, म्हणून पोलीस पाटील लक्ष्मण माहूरे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी यांनी कामठा येथे करण्यात आलेल्या होम क्वारंटाईन सेंटरला भेट दिली असता तिथे क्वारंटाईन केलेली महिला ही नांदेड येथे निघून गेल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या महिलेवरही बाळापूर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.