हिंगोली - डोळ्यासमोर जर आपला मृत्यू दिसत असेल तर आपण खरोखरच निःशब्द होतो. याचा प्रत्यय जिल्ह्यातील एका दाम्पत्याला आला आहे. केशव सीताराम खिलारी, रेखा सीताराम खिलारी (रा. सुकळी खु.) असे या दाम्पत्याचे नाव आहे. जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून एका वाघाने दहशत माजवत शेतकऱ्यांना सळो कि पळो करून सोडले आहे.
केशव आणि रेखा सलग दहा दिवस झालेल्या पावसामुळे भिजलेल्या सोयाबीन उघडे करून टाकत होते. दोघेही बोलण्याच्या नादात घाईगडबडीत सोयाबीन वर झाकलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न करत होते. तोच तुरीच्या ओळीतून त्यांच्या दिशेने येणारा वाघ रेखा खिलारी यांना दिसला. तेव्हा त्यांना आवाज देखील काढता आला नाही. आपली पत्नी अचानक गप्प का झाली, हे त्यांनी पत्नीकडे वळून पाहिले त्याच वेळी त्यांची देखील नजर वाघावर पडली. स्वतःला सावरत खिलारी हे सोयाबीनच्या सुडीवर कसेबसे चढले अन वरून पत्नीला त्यांनी हात दिला. पत्नीलाही वर घेतले दोघेही निपचित सोयाबीनच्या गंजीवर काही क्षण झोपून राहिले. तशाच अवस्थेमध्ये दोघेही जण वाघाकडे बघत होते. तर वाघ डरकाळ्या देत त्यांच्या सुडीपाशी काहीवेळ रेंगाळला आणि पुढे मार्गस्थ झाला. या प्रसंगात ते इतके घाबरले होते की, त्यांना सर्व संपल्यासारखेच वाटले होते. मात्र, वाघ तिथून निघून गेल्यावर दोघांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हेही वाचा -गावाने वाळीत टाकल्यामुळे 'तिचा' आत्महत्येचा प्रयत्न, त्वरित उपचारामुळे वाचला जीव
एक दिवस आधीच वाघाचा हल्ला -
याच गावात आदल्या दिवशी सुकळी येथील प्रकाश कबाले या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला होता. त्यामुळे येथील सर्वच ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मात्र पावसाने ढील दिल्यानंतर झाकून ठेवलेले सोयाबीन उघडे करण्यासाठी शेतकरी जीव मुठीत घेऊन सुडी उघडी करण्याचा प्रयत्न करत होते जे घडायला नको होतं शेवटी तेच घडलं. हा सर्व थरारक प्रकार सांगतात दोघाही पती-पत्नीच्या अंगावर काटे उभे राहिले होते तर त्यांचा थरारक प्रकार ऐकून ग्रामस्थ ही चांगलेच भयभीत झाल्याचे दिसून आले.
वाघाच्या भितीने जीव मुठीत -
वाघाच्या दहशतीने सुकळी गावातील ग्रामस्थ हे भयभीत झाले आहेत. त्यांनी शेतातील सर्वच कामे ठप्प ठेवली आहेत. एवढेच नव्हे तर गुरे देखील शेतामध्ये चारण्यासाठी न येता घरीच त्यांचे चारापाणी करत आहेत.
वन विभागाचे पथक दाखल -
या दोनही घटनांनतर वन विभागाचे पथक हिंगोली मध्ये दाखल झाले आहे. ज्या ज्या भागांमध्ये वाघाचे रेडिओ कॉलरद्वारे लोकेशन ट्रेस झाले आहे, त्या त्या भागात पथक गस्त घालत आहेत. तर वन विभाग वाघापासून बचाव करण्यासाठी काय उपाय योजना असतील किंवा वाघ असल्यास काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात सेनगाव परिसरातील काही गावांमध्ये जनजागृती करीत आहेत. तर जनजागृतीचे फलकही अनेक गावांमध्ये लावलेले आहेत.
एकंदरीत वाघाने मात्र शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतीचे देखील नुकसान होत चालले आहे. अस्मानी-सुलतानी संकट संकटानंतर आता वाघोबाचे संकट हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, घाबरून काही जाण्याचे कारण नाही. वाघ असलेल्या भागांमध्ये वनविभागाचे पथक तैनात करण्यात आहे. म्हणून या भागांमध्ये शेतकऱ्यांनी जाणे टाळावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी केली आहे.
हेही वाचा - पाण्यातून मानवी साखळी करून मृतदेह नेला स्मशानभूमीत, खामगाव तालुक्यातील पोरज येथील घटना