हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. तसेच कोरोना बाधितांबाबत प्रशासनाकडून सर्वसामान्य व्यक्ती आणि प्रतिष्ठित व्यक्ती यामध्ये दुजाभाव केला जात आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळेच बरेच कोरोनाबाधित समोर येत नाही आहेत. तसेच आता करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधी कमी करावा, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंचने जिल्हा प्रशासनाला केली आहे.
याबाबत या लोकमंचच्या शेख नईम शेख लाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. तसेच इतके करुनही काही फरक पडत नसेल तर 11 ऑगस्टला मंत्र्यांना ई-मेलद्वारे बांगड्याचा आहेर पाठवून पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालणार असल्याचा इशारा शेख नईम यांनी दिला आहे.
सध्याच्या परिस्थितीत हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण हा कोरोनाच्या दहशतीत आला आहे. ही साखळी रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 14 दिवसाचा लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, या कालावधीमध्ये सर्वसामान्य कुटुंबांना उपाशी रात्र काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यांच्याकडे रोजगारच नसल्यामुळे ते सैरावैरा झाले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा कालावधी कमी करण्यासाठी हे निवेदन देण्यात आले.
दरम्यान, दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थीदेखील विविध महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी सैरभैर झाले आहेत. कोरोनाच्या या काळात प्रवेश प्रक्रिया बंद असल्यामुळे, विद्यार्थ्यांनाही काही करता येत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.