हिंगोली - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मंदावली असली तरी अनेक तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील तिसऱ्या लाटेची शक्यता सांगत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आरोग्य मंत्री हिंगोलीत आले असताना ते सहभागी झालेल्या एका कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आहे. यावेळी अनेक जण विनामास्क उपस्थित होते.
टोपे यांच्याच ताफ्यात प्रचंड गर्दी -
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे हिंगोली येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनसाठी दाखल झाले होते. यावेळी सह्याद्री हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्री टोपे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी जिल्ह्यातील प्रतिनिधीदेखील दाखल झाले होते. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका टाळलेला नसताना या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच धक्कादायक बाब म्हणजे याच गर्दीमध्ये मोठ्या संख्येने दाखल झालेल्यांपैकी बऱ्याच जणांच्या तोंडाला मास्कदेखील नसल्याचे पाहायला मिळाले.
आरोग्य विभागाचे पथकेही झाली होती दाखल -
हिंगोली शहरातील सह्याद्री हॉस्पिटल येथे लोकार्पण सोहळा प्रसंगी आरोग्य विभागाची पथकेदेखील दाखल झाली होती. एकंदरीतच झालेल्या गर्दीमुळे याठिकाणी कोरोनाच्या नियम पूर्णतः पायदळी झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही कमी असली, तरी आजची गर्दी पाहून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता ही टाळता येत नाही. दरम्यान, सामान्य नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास त्यांना दंड भरावा लागतो. मात्र, लोकप्रतिनिधी सर्रासपणे या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातो आहे.