हिंगोली- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात सोमवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात अजून 22 जवानांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सामान्य रुग्णालयातील एका 24 वर्षीय परिचरिकेलाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली आहे.
संपूर्ण जगभरात खळबळ माजवलेल्या कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यातही झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी पॉझिटिव्ह आलेले सर्व जवान कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील बंदोबस्त आटोपून परतले होते. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या जवानांना आणि परिचारिकेला आयसोलेशल वार्डमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
यापूर्वी आयसोलेशल वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित जवानांचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आज घडीला जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 75वर पोहोचली आहे. त्यामुळे, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले गेले आहे.