हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आता शेतकरी पीक कर्जासाठी तलाठ्याकडे धाव घेत आहेत. अशातच एका तलाठी महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 12 शेतकऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पॉझिटिव्ह आलेली तलाठी महिला ही वसमत तालुक्यातील बोराळा येथे तलाठी आहेत. सध्या पीककर्ज काढणे तसेच विविध पीक कर्जमाफीचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने शेतकरी दिवस-रात्र करत तलाठ्याकडून सातबारा वेळापत्रकाआधी पीक कर्जासाठी लागणारे विविध कागदपत्र गोळा करण्यासाठी धाव घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बोराळा येथील तलाठी महिलेचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सदर महिलेच्या संपर्कात आलेला बारा शेतकऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अजुनही किती शेतकरी या महिला तलाठी यांच्या संपर्कात आले असावेत याचा शोध घेतला जात आहे. मात्र, एकदम बारा जणांना ताब्यात घेतल्यामुळे गावांमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
गावात सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या 12 शेतकऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे बोराळा येथील आरोग्य उपकेंद्राचे डॉ. दीपक खराटे यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने, प्रत्येकजण घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे. हिंगोली शहरात रुग्ण संख्या वाढल्यामुळे शहरात पाच दिवस संचारबंदी करण्यात आलेली आहे. तरीदेखील चोरून-लपून दुचाकीस्वार तसेच पादचारी शहरातील विविध भागात भटकंती करताना दिसून येत आहेत.