हिंगोली- जिल्ह्यात एकाच रात्रीत १२ ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहीती तपास अधिकारी संतोष वाठोरे यांनी सांगितले. या घटनेने ग्रामीण भागात भितीचे वातावरण पसरले आहे.
हिंगोली ग्रामीण हद्दीतील गंगानगर आणि रामकृष्ण नगरमध्ये चोरीची घटना घडली. घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील दागिने आणि रक्कम लंपास केली आहे. कोरोनामुळे बरीच कुटुंब ही गावाकडे किंवा नातेवाइकांकडे गेलेले आहेत. हीच संधी साधून चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल 12 ठिकाणी चोरी केली. एकाच रात्री एवढ्या ठिकाणी चोरी झाल्याने या परिसरात एखादी टोळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिसानी वर्तविली आहेत.
घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश बरडे, तपास अधिकारी संतोष वाठोरे यांनी श्वानपथकासह परिसरात पाहणी केली. मात्र, अद्याप चोरट्यांबद्दल माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.
दरम्यान, या परिसरात रोज पोलिसांकडून गस्त घालण्यात येते. मात्र पोलिसांना याबद्दल कोणताच सुगावा लागला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर लंपास झालेल्या एकूण मुद्देमालाची किंमत समोर येईल.