हिंगोली - सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे हैदराबादकडे मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात एक मजूर आणि 80 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील इतर पाच मजुरांना वाचवण्यामध्ये ग्रामस्थांना यश आले आहे. अमरसिंह असे मृत मजुराचे नाव आहे.
पूर्ण घटना काय?
अमर आणि इतर पाचजण ट्रकमध्ये 180 मेंढ्यासह राजस्थान वरून हैदराबाद मार्गे निघाले होते. ट्रकमध्ये मेंढ्या घेऊन जाताना अमरसिंह हा मेंढ्या एकमेकांवर आदळू नये तसेच कोणती मेंढी दबू नये याची पाहणी करण्यासाठी मध्येच बसला होता. तर इतर मजूर हे केबिनमध्ये बसले होते. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे चालक सत्येंद्र सिंह यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक उलटला. ट्रक उलटताना एकच आरडाओरड झाली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या ग्रामस्थांनी ट्रककडे धाव घेतली. ट्रकमध्ये अडकून पडलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यात आले. मात्र, अमर सिंहचा गुदरमरून मृत्यू झाला.तसेच या अपघातात तब्बल 80 मेंढ्यांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी हलविले आहेत.
हेही वाचा - कोरोनानंतरही धोका कायम - डॉ. ए. एम. देशमुख यांची खास मुलाखत
घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, पोलीस उपनिरीक्षक अभय माकने, जमादार कामाजी झळके, एस. डी. नरवाडे यांनी तत्काळ धाव घेतली. जखमींना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.