हिंगोली - कळमनुरी तालुक्याच्या मोरगव्हाण शिवारातील इसापूर धरणात पोहोयला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. तिघांचेही मृतदेह शोधून बाहेर काढले असून मृत तिघे हिंगोली येथील रहिवासी आहेत.
शिवम सुधीर चोंडेकर (वय 21, रा. भट्ट कॉलनी), रोहित अनिल चित्तेवार (वय 22 रा. पोस्ट कार्यालय रस्ता), योगेश बालाजी गडप्पा (वय 21 रा. बियाणीनगर, सर्व रा. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत. यांच्याशिवाय श्रीकांत संजीव चोंढेकर, निखिल नागोराव बोलके हे सर्व मित्र मिळून कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण येथून काही अंतरावर असलेल्या धरणात पोहोण्यासाठी गेले होते. काही वेळ पोहल्यानंतर श्रीकांत आणि निखील हे पाण्यातून बाहेर निघाले. पण, बराच वेळ झाला तरी शिवम, रोहित आणि योगेश हे धरणाच्या बाहेर न आल्याने त्यांना पाहण्यासाठी श्रीकांत व निखिल गेले. त्यांनी ही माहिती आजूबाजूच्या परिसरात काम करत असलेल्या ग्रामस्थांना त्यांनी दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे, फौजदार ज्ञानोबा मुलगीर, तहसीलदार श्रीराम पाचपुते, मंडळाधिकारी यु. आर. डाखोरे पोलीस कर्मचारी शामराव गुहाडे, गणेश सूर्यवंशी, नलावार घटनास्थळी आले. बराच वेळ पाण्यामध्ये शोध घेतला मात्र, तिघेजण कुठेही मिळून आले नाहीत, त्यामुळे घटनास्थळी गोताखोरांना पाचारण करण्यात आले. यामध्ये समशेर खा पठाण, कांता पाटील व काही ग्रामस्थांनी पाण्यामध्ये उड्या घेऊन तब्बल एका तासानंतर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनेचा पंचनामा करून तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.