हिंगोली - महिलेचा रुमालाने गळा आवळून खून करून तिच्या अंगावरील दोन लाख रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना घडली. सेनगाव तालुक्यातील तळणी येथे हा प्रकार घडला. मथुराबाई पांडुरंग कोरडे (वय-६०) अस मृत महिलेच नाव आहे.
मथुराबाई शनिवारी आपल्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास शेळ्या घरी परत आल्या मात्र, मथुराबाई घरी आल्या नाहीत. बराच वेळ कुटुंबीयांनी त्यांची वाट पाहिली. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. तुरीच्या शेतात मथुराबाईंचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचा - 'ठाकरे' सरकारचे खातेवाटप जाहीर, अजित पवार अर्थमंत्री तर आदित्य ठाकरेंकडे पर्यटन
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नरसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक येरेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी मथुराबाईंचा मुलगा नामदेव पांडुरंग कोरडे यांच्या फिर्यादीवरून नरसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.