हिंगोली- जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे. या ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना अर्ध्यावर उपचार सोडून खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. याच तक्रारीची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात झाडाझडती घेतली. यामध्ये अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्या सर्व बाबी सुधारण्यासाठी शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांना आठ दिवसाचा कालावधी देण्यात आला.
हेही वाचा- राज्यात भाजपचेच सरकार, मुख्यमंत्री आमचाच - चंद्रकांत पाटील
हिंगोलीचे जिल्हा सामान्य रुग्णालय हे नेहमीच वेगवेगळ्या बाबींसाठी चर्चेत असते. प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातांची नैसर्गिक प्रसुती न करता शस्त्रक्रिया (सिझेरीयन) करण्याचा सपाटा या रुग्णालयात लावला आहे. त्यामुळे हे रुग्णालय मुंबईपर्यंत चर्चेत आहे. मुख्य बाब म्हणजे या ठिकाणी असलेला औषधांचा तुटवडा रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे. नाईलाजास्तव रुग्णांना याठिकाणी अर्धवट उपचार सोडून खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत हे रुग्णालय मागे आहे. आजही प्रत्येक वार्डातील स्वच्छतागृहांची अवस्था बेकार झाली आहे. संबंधित वार्डचा 'इन्चार्ज' अनेकदा शल्य चिकित्सक यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार करतात. मात्र, त्यांना दादच दिली जात नसल्याने याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो.
आज या सर्व बाबींची पाहणी खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः केली. याठिकाणी एड्सग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी होणारी टोलवाटोलवी, यामुळे जिल्ह्यातील 42 एचआयव्हीग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब समोर आली. याची देखील माहिती मागवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. आता रुग्णालयाला आठ दिवसाचा सुधारणेसाठी कालावधी दिला आहे. मात्र, खरोखरच या कालावधीत हे रुग्णालय सुधारेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.