हिंगोली - जिल्ह्यात आज सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, तर औंढा नागनाथ तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे.
मुसळधार पाऊसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे खरीप पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. हिंगोली शहरातील काही भागात घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. गेल्या तीस वर्षांपूर्वी जिल्ह्यातील कुरुंदा गावात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्या गावात यंदाही हेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ग्रामस्थांच्या तीस वर्षांपूर्वीच्या त्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. पुरामुळे घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे ग्रामस्थ मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील विविध भागात रस्त्याचे व पुलाचे काम सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट आहे. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. याचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतोय. औंढा नागनाथ तालुक्यातून मधूमती नदीला पूर आला. यामुळे जवळपास नदीचा व्यास सोडून दोन्हीही बाजूने 100 मीटर पाणी वाहू लागले. त्यामुळे या भागातील गुरे देखील वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अद्यापही किती नुकसान झाले? हे समजू शकले नाही.