हिंगोली- शहरातील एनटीसी भागात असलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. प्रशासकीय अधिकारी जोपर्यंत शेतकऱ्यांची मागणी ऐकण्यासाठी येणार नाहीत तोपर्यंत कार्यातून अजिबात हलणार नसल्याचा पवित्रा शेतकरी संघटनेने घेतला आहे.
हेही वाचा- कोरोना विषाणू : भारतात २१ विमानतळांवर 'थर्मल स्कॅनिंग' सुरू..
कोरडवाहू शेतीसाठी पीक विमा दिला नाही
जिल्ह्यात बागायती शेतीला पीक विमा मंजूर केला. मात्र, फळ बागायती क्षेत्र किती आहे याचा अद्याप पत्ताच नाही. तरीदेखील फळबागायती क्षेत्राला पीक विमा मंजूर केला. वास्तविक पाहता सर्वाधिक जास्त कोरडवाहू क्षेत्र जिल्ह्यात आहे. त्याचे 80 टक्क्याच्यावर नुकसान झाले. तरीही पीक विमा कंपनीने कोरडवाहू शेतीसाठी पीक विमा दिला नाही. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात खुर्च्यासह फर्निचरची तोडफोड केली.
कार्यालयात आढळले दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पॉकेट
कार्यालयाला कुलूप होते. त्यामुळे संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांनी फोन केला होता. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांने कार्यालयात येण्यास स्पष्ट नकार दिल्याने या कार्यकर्त्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडले. कार्यालयात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पॉकेट आढळले आहेत. त्यामुळेच या कार्यालयाची तोडफोड केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
दागिने गहान ठेऊन भरला होता विमा
पीक विमा भरला तेव्हापासून पीक विम्याची वर्षभरापासून शेतकरी वाट पहात होते. पीक विमा भरण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागले होते. विमा भरण्याच्या रकमेसाठी महिलांच्या अंगावरील दागिने गहान ठेऊन विमा भरला होता. मात्र, विमा काही मिळाला नाही. त्यामुळे हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विमा कंपनीच्या कार्यालयात कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत.