हिंगोली - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याच्या मार्गावर आहे. शेगा भरणीला आलेले सोयाबीनचे पीक पावसामुळे पूर्णपणे पिवळे पडले आहे. त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट होणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांना योग्य औषध फवारणीचे मार्गदर्शन केले जात आहे.
हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच भविष्यात उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागात तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आर. एस .भालेराव, तालुका कृषी अधिकारी जी. बी. बंटेवाड, मंडळ कृषी अधिकारी जीएफ कच्छवे, बी. बी. गाडगे, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांना योग्य औषध फवारणी संदर्भात मार्गदर्शन करत आहेत.