हिंगोली- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने, सर्वत्र सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये बँकेतून काढण्यासाठी विविध बँकाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी गर्दी झाली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
जिल्ह्यातील विविध बॅंकांसमोर शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. अक्षरशः शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अतोनात प्रयत्न केला जात आहे.तर दुसरीकडे शेतकरी दोन हजार रुपयांसाठी तहान भूक विसरून बॅँकेच्या दारात उभे राहिले होते. शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने सोशल डिस्टंन्सिंग राहिले नाही.
हिंगोली जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सूरु आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाकडून जास्तच खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत आहे.