हिंगोली- दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आता पुन्हा सहा जण कोरोनाबाधित निघाल्याने हिंगोलीकरासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. नव्याने आढळलेले हे कोरोनाबाधित औंढा नागनाथ तालुक्यातील आहेत. 107 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होत चालल्यामुळे प्रशासनासह हिंगोली करांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. राज्य राखीव दलाचे जवान हे बरे होत चालले आहेत. तर दुसरीकडे मात्र मुंबई येथून परतणारे कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने त्या त्या गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये अजून सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सहाही जण मुंबई येथून परतलेले आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यात पहिला 45 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाने निगराणीखाली ठेवून त्यांचेही तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी या सहा जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर इतर पाच रुग्ण हे वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतेही गंभीर प्रकारची लक्षणे आढळून आलेले नाहीत. एकंदरीतच हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 107 वर पोहोचली आहे.