हिंगोली- सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील गणेश गायकवाड याला तेलंगणा पोलिसांनी अचानक ताब्यात घेऊन त्याला मारहाण केली होती. मात्र, शेगाव खोडके येथील गावकऱ्यांनी तेलंगणा पोलीस कर्मचाऱ्यांना व गणेश गायकवाड याला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवले. मात्र, या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी शेगाव ग्रामस्थांना मारहाण केली. इतकेच नव्हे तर आता याप्रकरणी पोलिसांकडून गावकऱ्यांना त्रास दिले जात आहे. त्याविरोधात शेगाव खोडके व म्हाळशी येथील ग्रामस्थाकंडून आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेगाव (खोडके) येथे रात्री-अपरात्री धाव घेत आरोपींना पकडण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांना सूचना देत आहेत. तोडफोड आणि पोलिसांना मारहाण प्रकरणी आठ ते दहा जणांना तुम्ही स्वतः घेऊन या, अशी सूचना गोरेगाव पोलिसांनी दिल्याचे तंटामुक्ती अध्यक्षांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री पोलीस गावात धाव घेऊन आरोपींना पकडण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. पूर्वी पावसाने, नंतर वाघाने आणि आता पोलिसांच्या भीतीने गावात दहशतीचे वतावरण निर्माण झाले आहे.
गणेश गायकवाड याचा कोणताही गुन्हा नसताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्याला पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे आम्ही गणेशच्या मदतीला धावून आल्याचे शेगाव (खोडके) येथील ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र, गोरेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ग्रामस्थांनी लेकरा बाळासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाड्याचे सचिव दिवाकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन मंडप टाकण्यात आले आहेत. नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची हकिगत ऐकून घेतली. आता सर्वच राजकीय पुढार्यांनी येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात तोडगा कसा निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; टोकाई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात