हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे गुरे घराला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याचा पाय घसरून वाहून गेल्याची घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती. काल पासून शोध मोहीम सुरू होती, अखेर तब्बल 22 तासानंतर शोध मोहिमेस यश आले असून, ओढ्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. गुलाब साहेबराव खिल्लारे (वय 40) असेे त्यांचे नााव आहे.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की खिलारे नेहमीप्रमाणे शेतामधून गोरे चारून घराकडे येत होते. गोजेगाव पासून काही अंतरावरच असलेल्या तलावाला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. मात्र, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी गुरे या तलावातून हाकत बाहेर काढले, अन् ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचा पाय घसरला व जोरात पाण्यात पडले. दरम्यान, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे, त्यांना पाण्यामध्ये पोहता येत नव्हते. ही बाब त्यांच्यासोबत शेतातून घरी येत असलेल्या काही सहकाऱ्यांनी सांगितली.
दुसऱ्या दिवशी पहाटे पासून, रेस्क्यु टीम गावात दाखल झाली. त्या नंतर ग्रामस्थ, पत्रकार अन् रेस्क्यु टीमने शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी 4 च्या सुमारास ओढ्यामध्ये आलेल्या गवतात मृतदेह आढळून आला. पावसाची संततधार सुरू असल्याने शोध कार्यामध्ये अडथळे निर्माण होत होते.
तरीदेखील रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांनी हे अडथळे बाजूला सारून शोधकार्य सुरू ठेवले होते. खिलारे यांचा मृतदेह आढळताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. पाण्याच्या बाहेर मृतदेह काढला असून शवविच्छेदनासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविण्याची प्रक्रिया सुरू होती. घरातील कर्ती व्यक्ती निघून गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अजून तरी या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंद झालेली नाही..