हिंगोली - हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअपने जोरदार धडक दिली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही हानी झाली नसली तरी वाहनाचे मात्र किरकोळ नुकसान झाले आहे. तात्काळ पोलिसांनी पिकअप ताब्यात घेतले आहे.
वर्षा गायकवाड हिंगोली दौऱ्यावर
शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री हिंगोली जिल्हा दौर्यावर आलेल्या आहेत. त्यांच्या जिल्हा नियोजन समिती तसेच कृषी विभागाचा आणि कोविडचा आढावा घेतला. बैठक आटोपल्यावर पालकमंत्री गायकवाड यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन आटोपून गायकवाड या रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी ताफ्यासह निघाल्या होत्या. दरम्यान हिंगोली शहरातील पीपल्स बँकजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एका पिकअपने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. यात चालकाने समयसूचकता दाखवत वाहन जोरात आणले त्यामुळे ही धडक वाहनाच्या पाठीमागील बाजूस लागली. त्यामुळे सुदैवाने कोणतेही हानी झालेली नाही मात्र वाहनांचे नुकसान झालेले आहे.
पोलिसांनी घेतला पिकअप ताब्यात
अपघात होताच पोलिसांनी तात्काळ सदरील पिकअप हा ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. याप्रकरणी अजून तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर पालकमंत्री गायकवाड या रामलीला मैदानाची पाहणी करून शासकीय विश्रामगृह येथे आल्या आहेत. याच वाहनाने त्या औरंगाबादकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - VIDEO खांद्यावर हात ठेवताच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला मारली थप्पड