हिंगोली - संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तर प्रशासन अतोनात प्रयत्न करीत आहेच. मात्र, कोरोनामुळे अडचणीत अडकलेल्यांसाठी अनेक जण धावून आले आहेत. हिंगोलीतील सर्वोदय सेवा भावी संस्थाने पुण्याच्या धर्तीवर 'सॅनिटायझर व्हॅन' बनवली आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन अन् पालिका प्रशासनासह आपत्कालीन स्थितीत कर्तव्य बजावणाऱ्यांसाठी हे वाहन संजीवनीच ठरणार आहे. जिथे जिथे कर्मचारी असतील तिथे तिथे ही व्हॅन नेण्यात येणार आहे.
कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा विदारक परिस्थितीत जीवाची जराही पर्वा न करता पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी दिवस रात्र राबत आहेत. यासाठी सर्वोदय एज्युकेशन सोसायटी अँड व्हॉलेंटरी अपंग निवासी विद्यालय, पोलीस प्रशासन अन् नगर पालिका प्रशासनाच्या वतीने बनविलेल्या सॅनिटायझर वाहनाचा सर्वांना कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे.
वाहनाचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या उपस्थितीत प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम वाहनात प्रवेश करताना हात धुवून प्रवेश करावा लागणार, वाहनात प्रवेश केल्यानंतर आटोमॅटिक नोजल सुरू होतील, साधारणपणे एक ते दोन मिनिटे यामध्ये व्यक्ती गेल्यानंतर सॅनिटायझर होऊन व्यक्ती बाहेर येणार आहे. यामध्ये असलेल्या टाकीमध्ये 500 लिटर सॅनिटायझर राहणार आहे. त्यामुळे दिवसभरात एक हजार लोक सॅनिटायझर होऊ शकतात. शहरातील चौकाचौकात ही व्हॅन उभी केली जाणार आहे. उद्घाटन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर पैंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, जगदीश भंडरवार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी रामदास पाटील यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सॅनिटायझर वाहनात अवश्य ते बदल करण्याच्या सूचना दिल्या.