हिंगोली - जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी वाढली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरात वाळूची वाहतूक रोखण्यासाठी पुढे येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस कर्मचारी शंकर जाधव यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात आठ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी नालेगाव परिसरात कोंबिग ऑपरेशन सुरू केले आहे. यामध्ये जवळपास 60 लाखांच्यावर वाळू साठे जप्त केले आहेत.
गोविंद चांदजी राखोंडे, गजू गायकवाड, संदीप अशोकराव राखोंडे, चांदजी राखोंडे, संजय कदम पहेलवान अशी आरोपींची नावे आहेत. तसेच तीन अनोळखी आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरातील नालेगाव रस्त्यावर अवैधरित्या उत्खनन केलेली वाळू आरोपी चोरून घेऊन जात होते. दरम्यान, शंकर दत्तराव जाधव या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने दोन्ही ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाळू माफियांनी जाधव यांच्यावर दगडफेक करून त्यांना मारहाण केली व ट्रॅक्टरसह पलायन केले. या प्रकरणाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. पोलीस आरोपी शोधण्यासाठी जवळा बाजार परिसर पिंजून काढत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला करण्याची ही घटना पहिली नव्हे, तर हिंगोली शहरापासून काही अंतरावरच असलेल्या औद्योगिक वसाहतीतही अशाच वाळू माफियांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला धक्का देऊन त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर सेनगाव तहसील कार्यालयात कारवाई करून लावण्यात आलेली वाळूची वाहनेदेखील चोरून नेली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या वाहनाला धकड देऊन, त्यांच्यावरदेखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
हट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाले आहेत. आरोपीच्या गावात व परिसरात केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये वाई गोरखनाथ, पेरजाबड, पोटा, अंखळी, तपोवन, बोरी सावंत, नाहद, सळणा, आसोला आदी ठिकाणी व आरोपीच्या घरी 4 हजार 30 ब्रास अंदाजे 60 लाख 45 हजाराची वाळू पकडली आहे. परिसरात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनने मात्र वाळू मफियांचे धाबे दणाणले आहेत.