हिंगोली - जिल्ह्यातील नरसी नामदेव हे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे प्रती पंढरपूर समजले जाणारे जन्मस्थळ आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत काल (१ फेब्रुवारी) संत नामदेवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलश रोहनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. संस्थेच्या वतीने सात दिवसांपासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी लाखों भाविकांनी एकच गर्दी केली होती.
मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने मागील तीन वर्षापासून या मंदिराचे बांधकाम हाती घेतले होते. जवळपास सहा ते साडेसहा कोटी रुपये खर्च करून जैसेल मेर दगडाचा वापर मंदीराच्या बांधकामासाठी वापरले आहेत. जवळपास १५ लाख रुपये किंमत असलेल्या आठ फूट उंच पंचधातू पासून बनविलेल्या कळशाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक निघणार असल्याने मिरवणूक मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच येथे २५ जानेवारी पासून रामयनाचार्य रामराव महाराज ढोक यांची संगीतमय रामायण कथा, तर हभप जयवंत महाराज बोधले यांनी संत नामदेव महाराज यांचे चरित्र सांगितले. या धार्मिक कार्यक्रमामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाणीही वाटप केले होते. आषाढी एकादशीनिमित्तही दरवर्षीच या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. मात्र, आज कलशारोहन कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांचा जथ्था पाहायला मिळाला. पोलिस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी परमपूज्य लोकेश चैतन्य स्वामी, सदानंद महाराज, आत्मा नंदगिरी महाराज, खाकीबाबा संस्थांचे कमलदास महाराज, गायन मूर्ती रामभाऊ महाराज राऊत, काशीराम महाराज ईडोळीकर यांच्यासह आ. तानाजी मुटकुळे, आ. जयप्रकाश मुंदडा, आ. रामराव वडकुते ,आ. हेमंत पाटील, माजी आ. बळीराम पाटील कोटकर, माजी खा. सुभाष वानखेडे, मंदिर जीर्णोद्धार समितीचे रामेश्वर शिंदे, नारायण खेडेकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, राम कदम, दिलीप बांगर, उद्धवराव गायकवाड, सतीश विडोळकर,संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, घायतडक यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झाले होते.