हिंगोली - जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला आहे. त्यात अचानक आज धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे रबी पिकाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या धुक्यामुळे वाहनांची गती मंदावली असल्याचे दिसून आले.
हेही वाचा - #CAA विरोध : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिंगोलीत युवकांनी स्वतःलाच केले 'जेरबंद'
हिंगोली जिल्ह्यात वाढत्या थंडीने रबीच्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पिकेही बहरात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. मात्र, अचानक दोन दिवसांपासून जिल्ह्यात धुक्याची चादर पसरत असल्याने, पिके धोक्यात सापडली आहेत. गहू, हरभरा, टाळकी आदी पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. मात्र, धुक्यामुळे ही पिके आता हातची जाण्याच्या मार्गावर असल्याची शंका शेतकरी वर्तवत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये गहू पोटरीत असून, हरभराही घाट्यावर आला आहे. मात्र, धुक्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव, तर गहू या पिकावर तांबेरा पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर भाजीपाला वर्गीय पिकेही हातची जाण्याच्या मार्गावर आहेत.
हेही वाचा - हिंगोलीत रोड रोमिओंना वाहतूक शाखेचा दणका; 25 वाहने जप्त