हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली हिंगोली जिल्ह्यातील बाजार पेठ आज सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. त्यानुसार दोन महिन्यापासून निर्मनुष्य असलेल्या रस्त्यावर नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच वाहतूक शाखेच्या रडारवर असलेल्या वाहनांना परवानगी दिलेली असल्याने, हिंगोली जिल्ह्यातील वातावरण सध्या इकडे-तिकडे चोहिकडे आनंदी आनंद गडेच दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच अस्थापना बंद होत्या. मागील काही दिवसांपासून हळूहळू काही अस्थापना उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढत आहेत. मात्र मंगळवारी रात्री काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच दुकाने सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये कपडे, शूज सेंटर, रंग रंगोटीची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. शिवाय इतरही दुकाने आज सुरू झाल्याने, हिंगोली जिल्ह्यातून कोरोना नष्ट झाला की काय, असाच प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. दोन महिन्यानंतर अचानकपणे संपूर्ण बाजारपेठ खुली झाल्याने बाजारपेठेत साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले.
मुख्य म्हणजे वाहनांनादेखील परवानगी असल्यामुळे दुचाकीसह तीन चाकी व चार चाकी वाहने रस्त्यावर फिरताना मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. दोन महिन्यापासून हिंगोली शहरातील अतिवर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधी चौक या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत होता. मात्र आज बाजारपेठ सुरू झाल्याने पूर्वीप्रमाणेच याठिकाणी वाहनासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पहावयास मिळाली. तसेच पोलीस बंदोबस्त होता मात्र सर्व काही सुरू झाल्यामुळे कर्तव्य बजावत असलेले कर्मचारीदेखील निवांत सावलीमध्ये दिसत होते. एवढ्या ही परिस्थितीत मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहन चालकांना ऑनलाइन दंड, तसेच त्यांना सूचना देत होते.
शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास हे राहणार बंद
शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास हे सर्व बंद राहणार असून ऑनलाईन कोचिंग क्लास मात्र सुरू राहतील. हॉटेल रेस्टॉरंट आणि आदरातीथ्य सेवा बंद राहतील, मात्र या सेवा, आरोग्य, पोलीस, शासकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी अडकून पडलेले व्यक्ती व पर्यटक आणि अलगीकरण केंद्रात सुरू असलेल्या सेवा व बसस्थानक रेल्वेस्थानकावरील चालू असलेल्या हॉटेल सेवा सुरू राहणार आहेत. सर्व सिनेमा गृह, केस कर्तनालय, स्पा, व्यायाम शाळा जलतरण पूल, करमणुकीची ठिकाणे, चित्रपटगृह, बार इत्यादी बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा विषयक, करमणूक विषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन साजरे होणारे कार्यक्रम यावर मात्र बंदी घालण्यात आलेली आहे. सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्व नागरिकांसाठी व धार्मिक कार्यक्रमासाठी बंद राहणार आहेत.
'या' साठी राहील नागरिकांना सूट
क्रीडा संकुल, क्रीडा मैदाने व इतर सार्वजनिक खुली मैदाने वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार आहेत. मात्र याठिकाणी प्रेक्षक व सामूहिक कार्यक्रमांना मात्र बंदी घालण्यात आलेली आहे. सर्व खासगी व सार्वजनिक वाहतूक करताना दोन चाकी वाहन केवळ एक व्यक्तीसाठी तर तीन अन् चारचाकी वाहन तीन व्यक्ती साठीच वापर करता येणार आहे. जिल्ह्यांतर्गत बस वाहतूक सेवा प्रतिबस वाहन क्षमतेच्या 50 टक्केपर्यंतच्या मर्यादित शारीरिक व सामाजिक अंतराचे पालन करून त्यांनी कायद्याचे पालन करून सुरू राहू शकतात.