हिंगोली - उदरनिर्वाहासाठी मुंबईला गेलेल्या कळमनुरी तालुक्यातील रुपूर येथील कुटुंबातील आई अन् मुलीची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पती सिद्धार्थ बलखंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर गावाकडे येऊन मृताची मुलगी अन् पतीने ग्रामस्थांसह कळमनुरी पोलिसांना आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन कळमनुरी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. श्रीनिवास रोहिलवार यांनी दिले आहे.
बलखंडे कुटुंबावर दबाव
सुरेखा सिद्धार्थ बलखंडे (आई), सुजाता सिद्धार्थ बलखंडे (मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. बलखंडे कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील दापोली येथे कामानिमित्त स्थलांतरित झाले होते. तेथे राहून मिळेल ते काम करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह भागवित होते. त्यांच्याच चाळीत हिंगोली जिल्ह्यातील पहेनी येथील प्रकाश यशवंत मोरेदेखील राहत होता. प्रकाशचे लग्न झाले होते, मात्र त्याच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याने सिद्धार्थ बलखंडे यांच्या सुजाता नावाच्या मुलीला लग्नासाठी अनेकदा मागणी घातली होती. मात्र सुजाताचे शिक्षण सुरू असल्याने बलखंडे कुटुंब यावर विचार करीत होते. मात्र प्रकाश लग्नासाठी बलखंडे कुटुंबावर नेहमी दबाव टाकत असे, त्याच्या या प्रकाराला बलखंडे कुटुंब चांगलेच हादरून गेले होते.
फोटो केले व्हायरल
कंटाळलेल्या सुजाताच्या आईने शहर पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तर पोलिसांनी सुजाताच्या आईची समजूत घालून किरकोळ 107 कलमाचा गुन्हा नोंद करून पाठवून दिले. मात्र या गुन्ह्यामुळे प्रकाशवर काहीही परिणाम झालेला नव्हता. तो मुलीचे फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करीत असल्याने सुजाताची आई सुरेखा हिने कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र काहीही झाले नाही. त्याने 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.15च्या सुमारास घरात शिरत लग्नाची मागणी केली. मात्र नकार मिळाल्याने त्याने चाकूने वार करायला सुरुवात केली. सिद्धार्थने हात पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यालाही लोटून दिले. त्यामुळे सिद्धार्थने बाथरूममधील खिडकीतून उडी मारून घर मालकाकडे धाव घेतली. यानंतर तो समोरून घरात येईपर्यंत सुजाता आणि तिची आई या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यामुळे ते हादरून गेले.
कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
शेजारीच असलेल्या प्रकाश यशवंत मोरेने दोघी माय-लेकींवर हल्ला केला. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात प्रकाश यशवंत मोरेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहे. मात्र या प्रकाराने बलखंडे कुटुंब हे हादरून गेले आहे.
'मारेकऱ्याला फाशीची शिक्षाच द्या'
माझ्या आई व बहिणीची एवढ्या निर्दयीपणे हत्या केली, दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तर त्यांचा गळा कापणारे चाकूदेखील त्यांच्या अवतीभोवती पडले होते. घरात सर्वत्र रक्त सांडले होते. हे विदारक दृश्य डोळ्यांसमोरून अजूनही जात नाही. आई अन् बहिणीचा चेहरा हा डोळ्यात बसलेला आहे. त्यामुळे असे घोर कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे म्हणून मुलगी रडत होती.