हिंगोली - राज्यात थंडीचा जोर वाढला असतानाच जिल्ह्यात ३ ते ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत होते. यातच आज(मंगळवार) पहाटे ६ वाजल्यापासून हळूहळू पावसाला सुरुवात झाली होती. तर, ८ वाजता मात्र पावसाचा जोर वाढला आणि १० मिनिटे मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे मॉर्निंग वॉकला गेलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर, आता रब्बी पिकांचेदेखील या पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पावसाची सुरुवात झाली तर, ८ च्या जवळपास जोरदार पाऊस आला. या मुसळधार पावसाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. सध्या गहू, हरभरा, तूर ज्वारी आदी पिके बहरात आलेली आहेत. मात्र, अचानक आलेल्या पावसाचा या पिकांना चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही हा पाऊस धोक्याचा असून, यामुळे विविध आजार जडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अपूर्ण घरकुलामुळे उकिरड्यावर काढतात दोन बहिणी रात्र; कळमनुरीतील विदारक चित्र
थंडीच्या कडाक्यात अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाल्याने लहान मुले तसेच वयोवृद्धांच्या आरोग्यावर याचा परिणाम होणार आहे. मागील ३ दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून यात आलेल्या पावसामुळेदेखील रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - हिंगोलीत तीन पंचायत समितींवर महाविकास आघाडी विजयी