हिंगोली- तालुक्यातील येळी येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. लॉकडाऊनच्या काळात कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ३० एप्रिल, २०२१ रोजी येळी या गावात बालविवाह होत असल्याची तक्रार चाईल्ड लाईनला मिळाली होती. त्यांनी जिल्हा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधून हा विवाह रोखला आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा महिला बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार ही कारवाई करण्यात आली.
हिंगोली तालुक्यातील येळी या गावात एका अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाचे नियोजन सुरू होते. हे नियोजन अतिशय बारकाईने काळजीपूर्वक सुरू होते. याची कुणालाही खबर लागणार नाही, याची काळजी घेतली जात होती. मात्र हा डाव जास्त वेळ टिकू शकला नाही. या संपूर्ण प्रकाराची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुंडे, बाह्यक्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदिप कोल्हे, टिम मेंबर स्वप्नील दिपके यांना मिळाली.
या सर्व पथकाने येळी गावातील ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी रविशंकर पाटील, सरपंच सुनिता शिवकुमार कापसे, पोलीस पाटील सदाशिव लिंबाळकर, अंगणवाडीताई अनुसयाबाई वाकळे यांनी मुलीच्या पालकांची भेट घेतली. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले, तसेच बालविवाहाच्या दुष्परीणामाविषयी समुपदेशन करण्यात आले. सर्वासमक्ष आई-वडिलांचा जबाब लिहून घेण्यात आला व सदरील बालविवाह रोखण्यात आला असल्याची माहिती जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.
गुन्हा केल्यास दंडात्मक कारवाईसह कारावास
बालविवाह लावून देण्याचा गुन्हा केल्यास आरोपींना एक लाख रुपये दंड आणि 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा करण्यात येते.
कुठे होत असेल बालविवाह तर कळविण्याचे केले आवाहन
सध्या शॉर्टकट विवाह लावून देण्यावर सर्वाधिक भर आहे. कोरोनामुळे मोठ्या गर्दीत विवाह सोहळे लावून देण्यावर प्रशासनातर्फे बंदी घातलेली आहे. मात्र बऱ्याच गावात प्रशासनाच्या सूचनांचे अजिबात पालन होताना दिसत नाही. अशातच बाल विवाह उरकले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या गावात बालविवाह होत असेल त्याची गोपनीय माहिती देण्यात यावी, असे आवाहन महिला व बालकल्याण अधिकारी शिंदे यांनी केले आहे.