हिंगोली - स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील ग्रामस्थांना दरवर्षीच्या पावसाळ्यात मरणयातना भोगाव्या लागत आहे. रस्त्याअभावी एका गरोदर मातेला खाटेवर नेत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्याची वेळ करवाडी येथील ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधी झोपेत आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथून जवळच असलेल्या करवाडी या गावाला रस्ताच नाही. त्यामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात ग्रामस्थांना मरणयातना भोगाव्या लागतात. येथील ग्रामस्थांनी अनेकदा रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलने केली. मात्र, प्रशासनाला जाग आली नाही. एवढेच नव्हेतर रस्त्याच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकला होता. मात्र, प्रशासनाला पाझर फुटला नाही. परिणामी आज सुवर्णा गणेश ढाकरे या गरोदर मातेला खाटेवर टाकत चिखल तुडवीत नांदपूर येथे रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.
जिल्ह्यात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नांदापूर येथून करवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची भयंकर दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून साधे चालणेदेखील कठीण होऊन बसले आहे. अशाच भयंकर परिस्थितीमध्ये एका गरोदर मातेला खाटेवरून रुग्णावाहिकेपर्यंत पोहोचवण्याचे दुर्दैव ग्रामस्थांवर ओढवले आहे.
एकीकडे केवळ शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही म्हणून गाव विक्रीला काढले जातात, तर दुसरीकडे रस्ताच नसल्याने एका महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी खाटेचा आधार घ्यावा लागतो. गेल्या वर्षी देखील एका गरोदर मातेला खाटेचा आधार घेत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली होती. तरीदेखील प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे आता करवाडी ग्रामस्थांवर दुसऱ्यांदा अशी वेळ आली आहे. आता तरी प्रशासनाला पाझर फुटतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.