हिंगोली - हातावर पोट घेऊन गावभर फिरणाऱ्या भिक्षेकऱ्यांच्या भोजनाची संचारबंदीमुळे दैना झाली आहे. मात्र, त्यांच्या मदतीसाठी ग्रामीण पोलीस धावून आले. त्यांनी सर्वांना खाद्यपदार्थांची पिशव्या दिल्या. त्यामुळे भिक्षेकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

सध्या कोरोनामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला आळा घालण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे दारोदारी जाऊन भिक्षा मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे हाल होत आहेत. संचारबंदीमुळे त्यांना दारोदारी फिरता येत नाही. तसेच त्यांना कोणी घरी पण येऊ देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ही बाब ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आगंद सुडके यांना कळताच त्यांनी पीठ, डाळ, तेल, तांदूळ यांचे पिशव्या तयार केल्या. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बी. एच. कांबळे, पोलीस हवालदार शिवानंद पोले, शेषराव लाखाडे, किशोर परिसरकर, अनिल रनखांब, शेख मोहम्मद, संगीता ससाणे, महिला पोलीस आहिल्या मुंडे यांनी दहा ते पंधरा भिक्षेकरी कुटुंबांना हे धान्य वाटप केले आहे. धान्य पाहून त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. तसेच खाकीमध्ये दडलेल्या माणुसकीचे दर्शन झाले.