हिंगोली - वाढत्या पर्यावरणाच्या समस्येवर तोडगा म्हणून राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली. शासनाच्या या निर्णयाची महानगर पालिका, नगरपालिकेच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांना विविध माध्यमातून प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत प्लास्टिक वापर सुरूच असल्याचे चित्र आहे. शनिवारी हिंगोली येथे पालिकेच्या तर सेनगावात नगर पंचायतीच्या पथकाने छापा टाकून अर्धा क्विंटलच्यावर प्लास्टिक जप्त करून विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
हेही वाचा - हिंगोली : हळदीच्या मोंढ्यात शेतकऱ्यांनी थांबवली हळदीची विक्री
हिंगोली जिल्ह्यात नगर पालिकेच्यावतीने प्लास्टिक वापरावर बंदी आणली होती. यासाठी अनेकदा विविध माध्यमातून जनजागृतीही केली. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करत प्लास्टिकचा सर्रास वापर करत आहेत. शनिवारी हिंगोलीत मुख्याधिकारी रामदास पाटील तर सेनगाव येथे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने किराणा दुकान, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्यासह थर्माकोलचे द्रोण, पत्रावळी, प्लास्टिक ग्लास विक्रीच्या दुकानावर छापे टाकले. यात सेनगाव येथे सहा व्यापाऱ्यांकडून ५० किलो प्लास्टिक जप्त करून ६० हजारांचा दंड तर हिंगोली येथे १० व्यापाऱ्यांकडून २४ किलो प्लास्टिक जप्त कर २१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचा - साहेब शाळेत खूप थंडी अन् पाऊस पण लागतोय ओ..!
नगरपंचायत आणि नगरपालिकेच्यावतीने अनेकदा प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करून देखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील आणि शैलेश फडसे यांनी सांगितले.