हिंगोली - जिल्ह्यात सेनगाव येथे एका नराधमाने चक्क मतिमंद युवतीवर (35) बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश अर्जुनराव लांडगे (30) (रा. धनगर गल्ली, सेनगाव) असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी पीडितेच्या शेतातील आखाड्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडवर पीडिता एकटी असल्याची संधी साधून आत प्रवेश केला आणि मतिमंद पीडितेवर अत्याचार केला. तसेच तिला ही घटना कोणाला सांगितली तर जीवे मारू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने ही बाब कोणाला सांगितली नव्हती. मात्र, पीडिता जेव्हा गर्भवती राहिली तेव्हा ही खळबळजनक घटना समोर आली.
या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात 376 (2), जे एल एन 448, 506नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस तत्काळ अटक करून सेनगाव न्यायालयासमोर हजर केले. यानंतर त्याला 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर यांनी दिली.