हिंगोली- कळमनुरी येथे आठवडी बाजारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने उडालेला पत्रा लागून जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विठ्ठल नेमाजी खंदारे (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास कळमनुरीत अचानक वादळी वारे सुटले. यामध्ये अनेक घरावरील पत्रे उडाले आहेत. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक झोपड्यादेखील उडून गेल्या. अण्णाभाऊ साठेनगर भागातील विठ्ठल नेमाजी खंदारे यांच्या घरावरील पत्रे उडाले त्यातील पत्रा लागून ते यामध्ये गंभीर जखमी झाले होते.
खंदारे यांना उपचार करण्यासाठी कळमनुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन नांदेड येथे रेफर केले होते.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना खंदारे यांचा मृत्यू झालाय. पत्रे उडाल्याने कळमनुरी शहरातील अजूनही तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कळमनुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कळमनुरी शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.