हिंगोली - संपूर्ण जगात खळबळ माजवलेल्या कोरोनाने सर्वांच्याच मनात दहशत निर्माण झाली आहे. शहरी ठिकाणी पोहोचलेला कोरोना आता ग्रामीण भागातही घुसखोरी करत आहे. त्यामुळे ग्रामिण भागात कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे आवलंबले जात आहेत. दाटेगावात तर ग्रामपंचायतीच्या वतीने चक्क गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धोतरापासून ग्रीन नेट बनविली अन् त्यात सॅनिटायझर बसविण्यात आले आहे. प्रत्येकाला सॅनिटाईज होऊनच गावात प्रवेश दिला जातो. सॅनिटाईजसाठी टाळाटाळ करणाऱ्यांना ग्रामस्थ थेट गावाबाहेरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे या गावाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. इतकेच नाही, तर संचारबंदीचा कालावधी देखील वाढविण्यात आला आहे. रस्त्यावर कोणालाही येऊ न देण्यासाठी पोलीस प्रशासन चोख कर्तव्य बजावत आहे. मात्र शहरी ठिकाणीच नव्हे, तर आता ग्रामीण भागात ही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथे ग्रामसेवक यू. टी. आडे यांनी ग्रामस्थांना कोरोनाबाबत मार्गदर्शन करून, हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही उपाययोजना सूचवल्या. त्यानुसार ग्रामस्थांनी होकार दर्शवत त्या अमलात आणल्या. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनल बनवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यासाठी ग्रामस्थांनी धोतर नेट आणि बॅटरीवरील फवारे दिली. ते अगदी व्यवस्थित बसवण्यात आले, अन् या ठिकाणी एका ग्रामपंचायत कर्मचऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. गावात येणाऱ्यांना याच प्रवेशद्वारातून जाणे बंधनकारक आहे. माणसं येतात कर्मचारी बटन सुरू करून सदरील व्यक्ती सॅनिटाईज होऊनच पुढे जातो. यासाठी गावातील इतर सर्वच रस्ते बंद केले असून, एकमेव रस्ता सुरू ठेवण्यात आला आहे. हा फंडा खरोखरच प्रत्येक गावात राबविला तर भयंकर असलेल्या कोरोनाला हरवून टाकणे सहज शक्य आहे. शिवाय गावात चारचाकी वाहनास देखील बंदी घालण्यात आली आहे. हा उपक्रम पाहण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पोहरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी, नितीन दाताळ, गणेश वाघ आदींनी भेट दिली. सर्वांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.