हिंगोली- महिनाभरापूर्वी मुंबईवरून हिंगोली जिल्ह्यातील एकांबा येथे आपल्या गावी पोहोचलेल्या व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सारी या आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले होते. तसेच त्या रुग्णासह त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचा आज कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने, हिंगोलीकरांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्यपथक व पोलीस प्रशासनाने एकांबा येथे भेट देऊन मृताच्या शेजाऱ्यांची नोंद घेतलेली होती. कधी नव्हे ते पथक वारंवार गावात येत असल्याने सर्वांचेच लक्ष अहवालाकडे लागले होते. हिंगोली जिल्ह्यातील एकांबा येथील व्यक्ती हा मुंबई येथे मंत्रालयात कार्यरत आहे. कोरोनामुळे मनुष्यबळ कमी केल्याने तो आपल्या मूळ गावी परतला होता. तो आला तेव्हापासून घरातच अलगीकरण कक्षात राहत होता. मात्र, दोन दिवसांपासून अचानक ताप येत असल्याने तो खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. तेथे उपचार घेतल्यानंतरही ताप काही केल्या कमी होत नसल्याने सदरील व्यक्ती हा जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेला असता डॉक्टराने तपासून उपचारासाठी दाखल करून घेतले.
उपचार सुरू असताना सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला होता. तत्काळ त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करीत मृतासह नातेवाईकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. तो अहवाल आज निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आहे. मृत ज्या ठिकाणी काम करीत होता तेथूनही त्याच्या अहवालाची प्रतीक्षा करीत हो0ते. निगेटिव्ह अहवालामुळे परिसरातील ग्रामस्थांची चिंता दूर झाली आहे.