हिंगोली - वसमत विधानसभा मतदारसंघात अनेक तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात युती आणि आघाडीचे आळीपाळीने वर्चस्व राहिलेले आहे. या विधानसभेतही आप-आपले वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर कामाला लागलेले आहेत. दोन्ही पक्षाचे प्रकाश कामाला लागल्यामुळे ऐन वेळी जनता कोणत्या प्रकाशाला साथ देईल आणि कोणाचा प्रकाश पडेल याकडे साऱ्या जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?
मुंदडा आणि दांडेगावकर यांच्यामुळे वसमत विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. या २ जणांच्या भांडणाचा बरेच जण फायदा घेऊ पाहत आहेत. त्यामुळे दोघांच्या वादात तिसऱ्याचाच फायदा होतो की काय? अशी परिस्थिती या मतदार संघात आहे. कारण वसमत मतदार संघात अॅड. शिवाजीराव जाधव हे कामाला लागलेले आहेत. त्यामुळे ऐन वेळी त्यांचे देखील पारडे जड होण्याची शक्यता आहे.
वसमत मतदारसंघातील समस्या
रोजगाराचा प्रश्न
रोजगाराच्या संधी नसल्याने बेरोजगारी वाढली. त्यामुळे रोजगाराच्या शोधात या भागातील मतदार परराज्यात पोहोचलेले आहेत. तर अनेकांनी आपली घरे सोडून उपजीविका भागवली तिकडे धाव घेतली आहे.
हेही वाचा - आढावा मतदारसंघाचा : अतिसंवेदनशील 'अहेरी मतदारसंघात' तिरंगी लढतीची शक्यता
रस्ते वाहतूक समस्या
वसमत विधानसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्रात रस्त्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ग्रामीण भागात तर अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील कित्येक वर्षांपासून गंभीर बनलेला वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही कायमच आहे. तो सोडविण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्नच होत नसल्याने, नागरिकांची वाहतूक ही समस्या अक्षरशः डोके दुखी ठरत आहे.