हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या 'आयसोलेशन वार्ड'मध्ये आज एकूण दहा कोरोना संशयित रुग्ण दाखल केले आहेत. त्यापैकी आठ रुग्ण हे श्वसनाचा त्रास होत असल्याने 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेल्या घरातील आहेत. त्यांचे अहवाल औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत.
राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली येथील प्रशासन गतीने कामाला लागले आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका कोरोनाची लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरू असून आतापर्यंत 28 कोरोना संशयित आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले होते, त्यापैकी निगेटिव्ह आलेल्या 19 रुग्णांना आयसोलेशन वार्डमधून सुट्टी दिली आहे.
तर आज आठ कोरोना संशयित रुग्णांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले आहे. हे आठही रुग्ण श्वसनाचा आजार असल्याने मृत्यू झालेल्या तरुणीच्या घरातील आहेत. तर पूर्वीच दाखल असलेल्या कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. आठ रुग्णांचे अहवाल औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे प्रलंबित आहे.