हिंगोली- मागील काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन काळामध्ये संपूर्ण वाहतूक बंद सेवा बंद होती. त्यामुळे अपघाताला बराच ब्रेक लागला होता. परंतु जिल्ह्यामध्ये शिथिलता झाली अन वाहतूक सुरळीत झाली असून पुन्हा अपघाताच्या घटनेत वाढ होत चालली आहे. ट्रिपल सिट जाणाऱ्या एका दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (27 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास घडली.
सचिन गौतम मुळे (वय 19 वर्षे, रा. सिद्धार्थ नगर, औंढा नागनाथ), असे मृताचे नाव आहे. तर सुंदर मुळे व मयूर मुळे (दोघे रा. सिद्धार्थ नगर औंढा नागनाथ) हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघे जण एका दुचाकीवरून औंढा येथून वसमत मार्गे जात होते. दरम्यान, कुरुंदा गावापासून काही अंतरावर यांच्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात सचिन हा रस्त्यावर पडला. दरम्यान त्याचे डोके अज्ञात वाहनाच्या खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जण हे रस्त्याच्या कडेला जाऊन पडले होते.
घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या प्रकरणी गुरुवारी (27 ऑगस्ट) सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. या अपघातात होतकरु मुलाचा मृत्यू झाल्याने, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! हिंगोली जिल्ह्यात फेसबुक लाईव्ह करून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न